Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

उत्तूरला झाला आदिशक्तीचा जागर 

Location: **उत्तूर ** | Published: **October 22, 2026**

उत्तूरला झाला आदिशक्तीचा जागर 

उत्तूरला झाला आदिशक्तीचा जागर 

'मी आदिशक्ती' कार्यशाळेतून किशोरवयीन मुलींचे भावविश्व उलगडले 

अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी साधला संवाद 

उत्तूर - सामाजिक दायित्व या भावनेतून उत्तूर येथील निर्मिती मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवात 'मी आदिशक्ती' ही कार्यशाळा आयोजित केली होती. या निमित्ताने कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी मुलींशी संवाद साधत मार्गदर्शन केले. गप्पा, मनमोकळा संवाद आणि छोट्या छोट्या खेळातून किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या मानसिक व शारीरिक प्रश्नाची समर्पक उकल अनुराधा भोसले यांनी केली.  
  'मी आदिशक्ती' कार्यशाळेचे यंदाचे २६ वे वर्ष होते. 'उंबरठा : वयात येताना स्वतःला ओळखताना' हा कार्यशाळेचा विषय होता. उत्तूर येथील श्री दत्त पंत समर्थ मंदिर इंदिरानगर येथे कार्यशाळा झाली. यावेळी विविध शाळांमधील १५० विद्यार्थिनी कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी, मानसिकदृष्टया खंबीर बनविण्यासाठी 'मी आदिशक्ती' कार्यशाळेत धडे दिले गेले. किशोरवयामध्ये पदार्पण करताना मुला-मुलींच्या शरीरात आणि मनात होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची होती. किशोरवयात स्वतःला ओळखणे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे, योग्य-अयोग्य यातील फरक समजणे याबाबत समुपदेशन करण्याबरोबरच मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी अनुराधा भोसले यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत विजय पाकले यांनी केले. सरपंच किरण आमणगी यांनी प्रास्ताविक केले. सौरव वांजोळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैशाली आपटे, केशव पंडित, अलका शिंदे यांची उपस्थिती होती. आभार अस्मिता गुरव यांनी मानले.

प्रभावी व्यासपीठ

अनुराधा भोसले यांनी मुलींशी संवाद साधतांना त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची प्रभावीपणे उकल केली. त्यांना विश्वासात घेऊन मुलींना बोलते केले. समस्यांवर उपाय आणि मार्ग कसा काढायचा याचे मार्गदर्शन केले. समाजात वावरतांना सर्व प्रसंगात आत्मविश्वासाने आणि धीटपणे समोरे जाता यावे यासाठी 'मी आदिशक्ती' कार्यशाळा' मुलींसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली. महिलांचा आदर आणि सन्मान राखला जावा हा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज मनावर बिंबवला गेला.
---------------------
अशोक तोरस्कर, उत्तूर